Saturday, March 22, 2008

दाढी काढून पाहिला

दाढी काढून पाहिला आन् दाढी वाढून पाहिला
चेहरा कंटाळवाणा पण अबाधित राहिला

मी सिनेमाला जरी सुरुवातीला कंटाळालो
फक्त पैसे वसूल व्हावे म्हणून शेवट पाहिला

चार मिळता चार लिहिली ना कमी ना जास्त ही
प्रेमपात्रा ना ही कागद रद्धीचा मी शोधला

नामस्मरणाला सुद्धा दिधली ठराविक वेळ मी
मी किलो आन् ग्रॅम वरती मोक्ष मोजून घेतला

लाल हिरवे दीप येथे पाप पुण्याचे उभे
सोयीचा जो वाटला मी तोच सिग्नल पाळला

मी धुके ही पाहिले आन् धबधबे ही पाहिले
पण तरी मी शेवटी माझाच फोटो काढला

मी पिझा ही चापतो आन् भाकरी ही हाणतो
घास जो पडला मुखी मी तो रवन्थत ठेवला

भोगताना योग स्मरला योगताना भोग रे
राम ही ना झेपला मज कृष्ण ही ना झेपला

मी मला दिसलो असा की ना जसा दिसलो कुणा
कुरूपतेचा आळ कायम आरशावर ठेवला

Tuesday, February 26, 2008

माझी अमेरिकेत झालेली पहिली कविता - Aditi Chiplunkar

परतून यावे सोळावे वर्ष
परतून यावे ते दिवस
मानसिकता राहावी अशी
की झकोळून जावी ही आवस.

स्वप्न पडावीत तशीच निरागस
आकाश वाटावे तितकेच ताजे
सगळी कटुता विसरून जाऊन
जग पुन्हा व्हावे माझे.

पण यावेळी ती चूक
मी पुन्हा करणार नाही
आयुष्याला परत एकदा
गृहीत धरणार नाही.

तीच माणसे, त्याच घटना,
द्रूष्टिकोनही तोच हवा,
माझ्याकडून मात्र आपुलकिचा
थोडा अधिक वर्षाव व्हावा.

समजून घेईन यावेळी सगळ्यांना,
समजून घेईन सगळेच अर्थ
एकही व्यक्ती, एकही संधी,
मी जाऊन देणार नाही व्यर्थ.